१३ वर्ष्याच्या मुलीने पोहून पार केलं ३१ किलोमीटर चा समुद्र ते हि फक्त ४ तासात ! वाचा पूर्ण माहिती

मुली कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत. त्यामुळे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देण्यासाठी उदयोन्मुख जलतरणपटू गीता महेश मालुसरे हिने मुंबईतील प्राँग्ज लाइट हाउस ते गेट वे ऑफ इंडिया ते वाशी खाडी पूल हे समुद्रातील ३१ किलोमीटर अंतर अवघ्या ४ तास ५५ मिनिटांत पोहून पार केले.

 

गीता ही मूळची मुळशी तालुक्‍यातील जामगाव येथील असून, सध्या पुण्यातील अहिल्याबाई होळकर शाळेत इयत्ता सातवीत शिकत आहे. तिने आपला तेरावा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी आपल्या आवडीचे क्षेत्र असलेल्या जलतरणाच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देण्याचे तिने निश्‍चित केले. त्यासाठी प्राँग्ज लाइट हाउस ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते वाशी खाडी पूल हे समुद्रातील ३१ किलोमीटर अंतर पोहून पार करण्याचे ठरविले.

गीता हिने वाढदिवसाच्या दिवशी शुक्रवारी सकाळी ७ वाजून २६ मिनिटांनी या मोहिमेला सुरवात केली. मात्र, जसजसे ऊन वाढत चालले तसतशा लाटा वाढू लागल्या व तिला पोहण्यासाठी अडथळा येऊ लागला. समुद्रातील अत्यंत खारट पाणी, मुंबईला लागून असल्यामुळे प्रचंड घाण पाणी, उन्हाचा तडाखा आणि वाढत असलेल्या लाटांचा तिला खूप त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला दोन वेळा उलटीही झाली; परंतु संकल्प पूर्ण करण्याच्या निश्‍चयाने तिचा उत्साह वाढतच होता.

 

सगळ्या परिस्थितीवर मात करून ती पुढे सरकत होती. समुद्रात गस्त घालणारे महाराष्ट्र पोलिस व सैनिक चौकशी करून तिला शुभेच्छा देत होते. दरम्यानच्या काळात वाढत्या लाटांमुळे तिची पोहण्याची गती थोडी मंदावली होती; परंतु ध्येय नजरेत आल्यामुळे शेवटच्या १५ मिनिटांत तिने पोहण्याचा वेग सुरवातीपेक्षाही वाढवला. अखेर तेरा वर्षांच्या गीताने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हे ३१ किलोमीटरचे अंतर अवघ्या ४ तास ५५ मिनिटांत पार केले. या यशस्वी मोहिमेनंतर पुन्हा रस्ता मार्गे गेट वे ऑफ इंडियावर येऊन तिथे केक कापून गीताचा वाढदिवस साजरा केला.

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!