PNB घोटाळा सोप्या सध्या शब्दात समजून घ्या

पंजाब नॅशनल बँक स्कॅम (PNB Scam) बाबतीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत पण अजूनही संपूर्ण माहिती उघडकीस येणे बाकी आहे. या संबंधात गेल्या ३-४ दिवसांपासून टीव्ही आणि वृत्तपत्रात जे काही चर्चेत आहे ते आपण वाचले असेलच. PNB घोटाळ्याशी निगडित बातम्यांमध्ये बँकेच्या व्यवहारातील काही गोष्टींचा सातत्याने उल्लेख होत आहे, जसेकी लेटर ऑफ अंडरटेकिंग (Letter of Undertaking किंवा LoU), स्विफ्ट मेसेज (SWIFT Message), इम्पोर्ट बिल वगैरे.

हा घोटाळा आणि त्यात गुंतलेल्या रकमेचा मोठा आकडा यामुळे गोंधळात न पडता, तो कसा झाला असावा, ते समजून घेऊयात.

सुरुवात करूयात लेटर ऑफ अंडर टेकिंग म्हणजेच LoU आणि स्विफ्ट मेसेज या बँकिंग व्यवसायातील काही नेहमीच्या व्यवहारांनी.

असं समजा एक माणूस आहे ज्याचे नाव आहे निरव, त्याला दुसऱ्या देशातून हिरे, मोती आपल्या देशात आयात (Import) करायचे आहेत. पण आयात करायचे म्हणजे पैसे हवेत. निरव एका बँकेत जातो, पंजाब नॅशनल बँकेत. बँक त्याला कर्ज देऊ करते, जवळपास १०% व्याज दराने. १०% व्याज दर खूप जास्त आहे असा विचार निरव करतो. जर दुसऱ्या देशातून कर्ज घेतले जे की डॉलर मध्ये असेल तर व्याज दर असेल जवळपास ३.५%. हा तर खूपच कमी व्याज दर आहे, तो ठरवतो की दुसऱ्या देशातून कर्ज घ्यायचे.

पण दुसऱ्या देशातील बँक निरवला ओळखत नाही मग ती त्याला कर्ज का देईल? पण भारतातील पंजाब नॅशनल बँक जिथे निरव चे व्यवसायिक खाते आहे ती निरवला ओळखते. निरव त्याच्या बँकेला म्हणतो की मला दुसऱ्या देशातून कर्ज घ्यायला मदत करा, तुम्ही हमी घ्या की मी जर त्या विदेशी बँकेचे कर्ज फेडले नाही तर तुम्ही फेडाल आणि तसे लिहून द्या. अशा पत्रकाला म्हणतात लेटर ऑफ अंडरटेकिंग (Letter of Undertaking).

ह्याबदल्यात निरवला पंजाब नॅशनल बँकेकडे तारण म्हणून काही रक्कम ठेवावी लागणार. जर विदेशी बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाची रक्कम आहे ५० कोटी रुपये तर तारण म्हणून ५५ कोटी रुपये रक्कम ठेवावी लागेल. तारणाव्यतिरीक्त, लेटर ऑफ अंडरटेकिंग (LoU) ही सुविधा पुरवल्याबद्दल निरवला पंजाब नॅशनल बँकेला २% वार्षिक शुल्कही द्यावे लागणार. जसे तुमचा पगार झाल्यावर तुम्हाला बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेज येतो काहीशा तशाच प्रकारे जगातील बहुतांश स्थानिक आणि विदेशी बँका एक-दुसऱ्याशी पैशांचे व्यवहार करतांना एका विशिष्ट आणि सुरक्षित मेसेजिंग प्रणालीचा वापर करतात. ह्या प्रणालीला म्हणतात स्विफ्ट सिस्टम (SWIFT System) आणि ह्याचा वापर करून पाठवलेल्या मेसेज ला म्हणायचे स्विफ्ट मेसेज (SWIFT Message).

एकदाका तारण मिळाले की पंजाब नॅशनल बँक त्या विदेशी बँकेला हे कळवते की निरवला कर्ज द्यायला हरकत नाही कारण आम्ही त्याला LoU दिले आहे, म्हणजेच उद्या जर त्याने तुमचे कर्ज बुडवले तर आम्ही त्याची परतफेड करू. निरवने तारण ठेवल्याकारणाने पंजाब नॅशनल बँकेलाही ह्यात कुठलीही जोखीम नाही. पंजाब नॅशनल बँक त्या विदेशी बॅंकेला हे सर्व एका स्विफ्ट मेसेज द्वारे कळवते. पंजाब नॅशनल बँकेकडून स्विफ्ट मेसेज मिळाल्यामुळे विदेशी बँकेलाही ह्यात कुठलीही जोखीम दिसत नाही. विदेशी बँक निरवच्या कर्जाची रक्कम पंजाब नॅशनल बँकेला पाठवते आणि ही रक्कम पंजाब नॅशनल बँक निरवला देते.

निरव ही रक्कम घेतो, हिरे-मोती आयात करतो, ते विकतो आणि त्यातून मिळालेले पैशातून त्याने घेतलेल्या कर्जाची व्याजासकट परतफेड करतो आणि पंजाब नॅशनल बँकेला तिने दिलेल्या LoU सुविधेबद्दल शुल्कही देतो. निरवने कर्जाची परतफेड केल्यामुळे LoU ही संपुष्टात येतो. विदेशातून कर्ज घेणे, त्यासाठी स्थानिक बँकेने LoU देणे, तारण ठेवणे, स्विफ्ट मेसेज पाठवणे अशा पद्धतीचे व्यवहार आयात करणारे बहुसंख्य व्यापारी करतात आणि ह्या संपूर्ण व्यवहारात कोणाचेही नुकसान अथवा घोटाळा होत नाही. पण पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा झाला तो असा :

१) निरवने पंजाब नॅशनल बँकेकडून LoU तर मिळवले पण त्याकरता तारण म्हणून कुठलीही रक्कम ठेवली नाही. हे तो करू शकला कारण बँकेच्या LoU मंजूर करणाऱ्या कर्मचाऱ्याने त्याला साथ दिली. बँकेचा जो कर्मचारी स्विफ्ट मेसेज पाठवण्याचे काम करतो त्यानेही स्विफ्ट मेसेज पाठवला. ही झाली घोटाळ्याची फक्त सुरुवात

२) तारण जरी ठेवले नाही तरी कर्जाची परतफेड करावीच लागणार कारण ते तर विदेशी बँकेकडून घेतले आहे. पण निरवला कदाचित हे कर्ज फेडायचे नव्हते म्हणून त्याने एक शक्कल लढविली. ह्या कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यासाठी त्याने आणखी एक कर्ज घेतले. पहिले कर्ज घेतानाचीच पद्धत परत वापरली गेली, त्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या कर्मचाऱ्याने तारण न मागता आणखी एक LoU मंजूर केले, पुन्हा स्विफ्ट मेसेज पाठवण्यात आला आणि नवीन कर्जाची रक्कम जुने कर्ज फेडण्यासाठी वापरली गेली. दुसऱ्या वेळेस कर्जाची रक्कम मात्र वाढवण्यात आली.

३) LoU मंजूर झाल्यावर त्याची नोंद बँकेच्या सॉफ्टवेअर मध्ये व्हायला हवी होती पण घोटाळ्यात सामील असलेल्या कर्मचाऱ्यांनी ह्या आणि अशा अनेक LoU ची नोंद बँकेच्या सॉफ्टवेअर मध्ये केलीच नाही. पहिले कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज दिले गेले, कर्जाची रक्कम वाढवण्यात आली, वेगवेगळ्या विदेशी बँकांकडून आणखी कर्ज घेतले गेले आणि त्यासाठी अनेक नवीन LoU मंजूर करण्यात आले आणि हे सर्व बिन तारण झाले, बँकेच्या सॉफ्टवेर मध्ये नोंदी न करता. असे करत करत २०११ ते २०१७ ह्या दरम्यान २९३ LoU मंजूर केले गेले आणि कर्जाची रक्कम ११,३०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. घोटाळा समोर कसा आला : निरवच्या कंपनीचे लोक एका जुन्या कर्जाच्या LoU ची परतफेड करता यावी या करता एक नवीन LoU मंजूर करून घेण्यासाठी जानेवारी २०१८ मध्ये पुन्हा त्या बँकेच्या शाखेत गेले आणि नवीन LoU ची मागणी केली.

ह्यावेळेस LoU मंजूर करणारा जुना कर्मचारी मात्र निवृत्त झालेला होता आणि त्याच्या जागी नवीन कर्मचारी आलेला होता. नवीन कर्मचाऱ्याने निरवच्या कंपनीला दिलेला जुना LoU बँकेच्या सॉफ्टवेअर मध्ये पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याला आश्चर्याचा धक्का बसला. निरवच्या कंपनीला मंजूर केलेल्या ह्या जुन्या LoU ची नोंद त्याला सापडली नाही. जवळपास २८० करोड रुपयाचे कर्ज असलेल्या ह्या LoU ची नोंद न सापडल्याकारणाने बँकेने लगेचच पोलिसांकडे FIR नोंदवली. सोबतच बँकेने ह्याचीही पडताळणी चालू केली की निरवच्या कंपनीला असे आणखी किती LoU मंजूर केले गेलेत आणि मग हा घोटाळा उघडकीस आला. विचार करायला लावणाऱ्या गोष्टी :

१) बँकेचे म्हणणे आहे की LoU ची नोंद नसल्याकारणाने ऑडिट (लेखापरीक्षण) मध्ये ही गोष्ट उघडकीस आली नाही. ह्यात तथ्य असेलही पण स्विफ्ट मेसेज पाठवल्याच्या नोंदी आणि कंपनीच्या बँकिंग सॉफ्टवेअर मधील नोंदी ह्या मध्ये सुसंगती पडताळणे हे बँकेचे आणि ऑडिटर चे काम होते.

२) जर विदेशी बँकेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणवर कर्ज मंजूर होऊन ते बँकेच्या अकाउंट मध्ये जमा होत असेल तर, एवढी रक्कम कुठून येतीये ह्याचा मागोवा घेणे सहाजिक होते ३) कोट्यवधी रुपयांच्या LoU च्या मंजुरीचे स्विफ्ट मेसेज पाठवणार क्लार्क पातळीवरील कर्मचारी आणि २०११ पासून एवढी वर्षे LoU मंजूर करणारा कर्मचारी, हे स्कॅम फक्त ह्या दोघांचे काम असू शकते हे पचनी पडणे जरा अवघडच आहे. २०११ पासून ऑडीटर किंवा बँकेच्या वरिष्ठांच्या हे लक्षात न येणे हे एवढे साधे सोपे प्रकरण असण्याची शक्यता कमीच वाटते. पंजाब नॅशनल बँकेत तुमचे अकाउंट आहे? पंजाब नॅशनल बँकेत खाती असणाऱ्यांनी घाबरायची मुळीच गरज नाही. ११,३०० कोटी रुपये जरी मोठी रक्कम असली तरी पंजाब नॅशनल बँक बुडेल एवढी मोठी रक्कम ती नाही आणि वेळ आलीच तर पंजाब नॅशनल बँक ही एक राष्ट्रीयकृत बँक असल्याकारणाने देशाचे सरकार तिला भांडवल पुरवून नक्कीच वाचवेल.

कुठल्याही राजकीय पक्षाचे सरकार असले तरी पंजाब नॅशनल बँकेएवढ्या मोठ्या बँकेला दिवाळखोरीत जाऊ देणे देशाला आर्थिक दृष्ट्या आणि त्या पक्षाला राजकीय दृष्ट्या परवडण्यासारखे नाही.

We are eager to hear your EXPERT opinion

Close
error: Content is protected !!